श्रावण
श्रावण
सरी श्रावण येतात
चिंब अंगण भिजते
सय येते माहेरची
मला वाहूनिया नेते...
जाते वाहवत मी ही
माझ्या घराच्या अंगणी
तिथे रिमझीमतात
श्रावणाची सय गाणी...
आई उभी उंबऱ्यात
वाट लेकीची पाहते
सर श्रावणाची तिच्या
तशी डोळ्यात दिसते
सय येता माहेरची
तळे डोळ्याचे भरते
भरलेल्या तळ्यामध्ये
मन गहिरे डुंबते...
सरी श्रावणाच्या धुंद
फेर धरता अंतरी
मुक्या दुःखात बापाच्या
स्वप्न वसे भरजरी...
माझा येईल साजण
आता थकून भागून
त्याच्या सरबराईत
जाते माहेर वाहून...
सर श्रावणाची मग
नवी आशा जागवते
पुढच्या गं श्रावणाची
ओढ मनाला लागते...!