तू प्रेमरंग आहे (गझल)
तू प्रेमरंग आहे (गझल)
रंगात रंग वेडा तू प्रेमरंग आहे
संगात संग तुझिया मी ही मलंग आहे
निथळे जरा जरासे जे थेंब पावसाळी
बिलगून आज मजला भिजवीत अंग आहे
ओठांत थरथरे जी उमलून स्पंदने ती
तुज स्पर्शता सख्या रे झाली मृदंग आहे
बसता मिटून डोळे तू शांत गुणगुणावे
ओठावरी तुझ्या मी झाले अभंग आहे
माझ्यात तू जरासा मी ही तुझ्यात थोडी
हे एकरूप सारे बघ अंतरंग आहे