तोडा
तोडा
सये, तोडला गं, तोडा
भर भरला गं, वाडा।।धृ।।
शेर पायलीचा मोरं
तीळ तीळाने शिगोर।
जणु उतरंडी गाडा।।१।।
मोप कणगी आटली
ऐसपैस रे, दाटली।
वाजे शिकोशिक चुडा।।२।।
धनधान्य होई नाथ
माय काळी जगन्नाथ।
देव खळ्यावर गोळा।।३।।
चुडा पिवळा कासार
बेलं वाहे पिंडी वर।
दुग्ध अभिषेक भोळा।।४।।
औत तासे ही सुतार
कासरा वखरं नागर।
तासी पाखरांचा मेळा।।५।।
शिंपी कपडा गोंदतो
केश वारीक कापतो।
फुले माळ्याचाही मळा।।६।।
पुढे वाण्याचे दुकान
बेलदारा चे मकान ।
लोहाराचा मोठा वाडा।।७।।
मोची वाहनाची जोडी
सदा लक्ष्मु पायघडी।
पुण्य तोलतो बापडा।।८।।
गांव वेशीवर थोडी
मांग महाराची वाडी
हाकी स्वच्छ तेचा गाडा।।९।।
वरती गोंधळी चाळ
गाते खंडोबाची माळ
लावी मातेचा अंगारा।।१०।।
हा मसनजोगी आला
पैसा आडका काढला
हात चलाखी उतारा ।।११।।
घरं कुंभाराचे बरे
चाक काठीनेच फिरे
माती जीवाचा गाभारा।।१२।।
कष्ट करी घाम गाळी
दामकरी पुण्य झोळी
पै पै जोडतो रांगडा।।१३।।
धन्य धन्य सये तोडा
तोडा म्यावं, हा तोडला।
भर भरला गं, वाडा।।१४।।
होळी पार वेश ज्योत
सुखी समाधानी नातं
शेती पिकांचा गं तोडा।।१५।।
