थोर आमुची माय मराठी
थोर आमुची माय मराठी
आमुची बोली मराठी,दैवत अवघ्या महाराष्ट्राचे,
मुखी शब्द मराठी,भाग्य मोठे आमुचे,
करतो आम्ही गौरव, आमुच्या मायबोलीचा,
ज्ञानदेवांची वाचतो ज्ञानेश्वरी,स्मरीतो ठेवा लीळाचरित्राचा.१
अखंड महाराष्ट्राची तु माय मराठी,
भारुडे, पोवाडे,ओवी अन् अभंग गायलेली,
गोंधळ,भजन अन् किर्तनांत रंगलेली,
ग्रंथ,पोथी,कादंबरीत वाचलेली दुधावरची साय मराठी २
रचली तुझ्यासवे लोकगीते अनेक गं,
वाड्मयाच्या जोडीने आम्ही जपतो तुला गं,
नवलाई च्या उखाण्यात सजवतो तुला गं,
म्हणी वाक्प्रचार अन् अलंकाराने नटवतो तुलाचं गं ३
भासतेस तु आम्हा स्वराज्याची आई जिजाई,
कधी बहीणाबाई,कधी जनाई तु पंढरीची रखुमाई,
ज्ञानोबांची मुक्ताई, श्री कृष्णांची यशोदा आई,
तुझ्याच पायी मुलुख मराठी तनमन वाही…४
तुझ्या अस्तित्वाचा झेंडा सह्याद्रीवरी फडकतो,
तुझ्या शब्दांचा गोडवा मनामनांत रेंगाळतो,
भक्त आम्ही मराठीचे तुझीच पुजा करतो,
चालतो पाऊले तुझ्या वाटेवरती, तुझाच जप करतो,
आम्ही तुझाच जप करतो…५
