पाखरांची घरे...
पाखरांची घरे...
दूर दूर कुठेतरी,
खळखळणार्या नदीकिनारी,
चिमुकल्या पाखरांची घरटी,
फांदी- फांदी च्या झुल्यावर…
इवल्या इवल्या चोचीने,
कशी नक्षीदार विणलेली,
एका एका काडीमध्ये,
माया तुडुंब भरलेली…
काडीमध्ये काडी घालुन,
कशी सुरेख ओवलेली,
जन्मजात कारागीराने जणू,
घरटी रुपवंत शिवलेली…
कधी विहीरीवरच्या उंबरावर,
कधी ओढ्यातल्या करंजावर,
सुगरणीचा खोपा झुलतो वार्यावर,
शोधतो पाणथळ खंड्या विसावतो ओलाव्यावर…
सुतार पक्षांचं घरचं न्यारं,
चोचीचा आधार,देई खोडाला आकारं,
बाभुळ,वड,पिंपळ,असंख्य पाखरांच निवासस्थान,
कसा राहतं असेलं..?विना घरट्याचा मोर…
वस्तीच्या घरात भिंतीच्या दिऊळीत,
सुरेख जाळीदार घरटं,
घरट्यातल्या बिछान्यावर खेळतं,
चिऊताईच बाळं…
उन्हाच्या झळा, पावसाच्या सरी,
बहुढंगी पाखरांना सारखीच सारी,
शानदार घरटी, नानाविध पाखरांची,
झुडपांच्या मधोमध बारमाही पिंजलेली…
केवढी हुशार ही पाखरं,
इवल्याशा चोचीमध्ये एवढी कलाकुसर,
दिवसा घेती झेप आभाळभर,
रात्रीचा आधार हेच झुलतं घर… -
