सुरुवात पाऊसाची
सुरुवात पाऊसाची
चांदण्यांच्या लख्ख रात्री,
अचानकपणे…
आकाशामध्ये ढगांची दाटन व्हावी,
शुभ्र चांदण्यांनी माखलेलं आकाश,
बघता बघता काळवंडून जावं..
काजव्यांची चमचम क्षणात नाहीशी व्हावी…
लख्ख प्रकाशाचं रुपांतर अलगदपणे,
खिन्न अंधारात व्हावं,
आणि…
विजेच्या लखलखाटाने,
या अंधारावर मात करण्याचा प्रयत्न करावा..
मग...न राहता,
वार्यानेही आपला रुबाब दाखवावा,
वार्याच्या मंद झुळूकीसोबत,
हळुवार, एखाद्या थेंबाने आकाशातुन येवून,
जमीनीमध्ये विलीन व्हावं….
आणि चक्क स्पर्धाच सुरू व्हावी,
पाऊस, विज आणि वार्याची,
सगळीकडे निरव शांतता दाटावी,
आभाळाने मात्र नकळत स्वतःच अस्तित्व सिद्ध करावं….
आकाश आणि अवनी यांचे मिलन घडवताना..
