स्वतःसाठी जगायचे गेले राहून
स्वतःसाठी जगायचे गेले राहून
मुलगी म्हणून जन्माला आले,
संस्कृतीनुसार घेतले बदलून,
काळजी सर्वांची मनी ठेवून,
स्वतःसाठी जगायचे गेले राहून।।१।।
लग्ना अगोदर घरच्यांसाठी केले,
हिंडणे बागडणे ते गेले विसरून,
लहान भावंडांना घेत सांभाळून,
स्वतःसाठी जगायचे गेले राहून।।२।।
स्वप्ने रंगविली मनातच राहीली,
शोधण्या सूर कलेचे गेले झिजून,
पैंजणं छमछम पायीच थबकून,
स्वतःसाठी जगायचे गेले राहून।।३।।
लग्नानंतर संसार सुख शोधले,
सासरच्या कलेने घेतले वाहून,
नटणं सजणं कसं यावं जमवून,
स्वतःसाठी जगायचे गेले राहून।।४।।
मुलांसाठी सारं करीत राहिले,
शिक्षणास त्यांच्या घेतले झटून,
मायेच्या कुशीचा लळा लावून,
स्वतःसाठी जगायचे गेले राहून।।५।।
