स्वरांचं झाड
स्वरांचं झाड
स्वरांचं झाड-
असं वठून जात नाही
पांथस्थांना सोडून
असं निघून जात नाही,
त्याच्या अंगाखांद्यावरती
कित्येकांची घरटी
सुरांच्या किलबिलाटातून
झाड असं उठून जात नाही
स्वरांचं झाड-
असं वठून जात नाही
पांथस्थांना सोडून
असं निघून जात नाही
मुळं रुजलीत खोलवर
गाठत मनाचं तळघर
आलापाची फुलं अशी
पटकन सुकून जात नाही
स्वरांचं झाड-
असं वठून जात नाही,
पांथस्थांना सोडून
असं निघून जात नाही
स्वरांच्या झाडा तुला
पारंब्यावर द्यायचाय झुला
शारदेच्या वीणेची तार अशी
पटकन तुटून जात नाही
स्वरांचं झाड-
असं वठून जात नाही,
पांथस्थांना सोडून
असं निघून जात नाही
