स्वप्नातली गगनसफारी
स्वप्नातली गगनसफारी
वाटते मलाही घ्यावे,
आभाळाचेच चुंबन.
स्वप्नवेड्या विचारांनी,
गहिवरते मग हे मन.
आभाळाच्या कुशीत,
असावे सुंदरसे घर.
सौंदर्यात त्या पडावी,
चांदण्यांचीच भर.
हवेत तरंगणारा तो,
एक पलंग असावा.
त्यावर झोपतानाच,
चंद्राने पहारा द्यावा.
शितलतेची लहर नी,
नीरव शांतता असावी.
कुठल्याच चिंतेची,
मना काळजी नसावी.
अंगावर असावी तीच,
मेघांची तलम चादर.
सुखद स्वप्नांचा मग,
मनमुराद असे वावर.
मेघांचीच उशी असे,
मऊ आणि उबदार.
थंड वातावरणातही,
मायेच्या उबेचा बहार.
पहाटे उठवण्यासाठी,
अंगावर ते सूर्यकिरण.
गाढ आणि शांत त्या,
निद्रेतून उठणे कारण.
उठता शिंपडले जावे,
थेंब दवाच्या जलाचे.
सोबत गजर असावे,
खगांच्या किलबिलीचे.
ह्या शांत झोपेचे स्वप्न,
एकदा सत्यात उतरावे.
ध्येयवेड्या मनाने मग,
आभाळाचे चुंबन घ्यावे.
