खेळ भातुकलीचा
खेळ भातुकलीचा
अग आई बोर होतंय ग
हीच नुसती किरकिर....
आई म्हटली जा की ग
मयुरीकडे होईल मन स्थिर....
मग काय सईला मिळालं
खेळण्याचे स्वातंत्र्य स्वैर....
भातुकलीचा खेळ रंगला
खरचं नव्हतं काहीच गैर....
मग काय सईची बाहुली
आणि मयुरीचा बाहुला....
दोघांचा लग्नसोहळा
म्हणून सजवला बोहला....
लग्न अगदी दोघींनी
थाटामाटातच लावलं....
खेळ होता जरी तरी
विदाईच दृश्य भावल....
मग काय थाटला त्यांनी
बाहुला बाहुलीचा संसार...
रमल्या दोघी त्यातच नी
खेळ होता विसरल्या पार....
बाहुला जाई कामावर
तरी बाहुली करी घरकाम....
चहा, स्वयंपाकाशी दोस्ती
नी बाहुला आणे घरी दाम....
बाहुला आला घरी की
चहा अगदी तयारच असे....
गोडुल्या त्या बाहुलीसाठी
बाहुल्याच्या मनी प्रेम वसे.....
असा भातुकलीचा खेळ
दोघींनाही वाटे आपलासा....
नकळत का होईना रिजविला
संस्कार व संसाराचा वसा....
कधी भातुकली कहाणी
अधुरी नव्हती याची तृप्तता....
आईने नकळत पेरले संस्कार
हीच होती खेळाची गुप्तता....
