आवाज गर्भाचा
आवाज गर्भाचा
आईच्या गर्भातून आला
नाजूक कोमल आवाज
आतून रडत होती ती
मुलगी होऊनी नाराज
मुलीने दिली अशी
गगनभेदी आरोळी
सुन्न झाली जमलेली
सारी जन मंडळी
होते तिला म्हणायचे
आई मला जगू दे गं
या गर्भाबाहेरील जग
डोळे भरून पाहू दे गं
काय गं आई सर्वांनाच
असते पोर हवीहवीशी
पण कशामुळे गं अशी
झाली मी तुला नकोशी
मुलाची गं होईन तुझ्या
अगदी लाडकी बहीण
जन्मा येण्या आधीच्या
मरण यातना कठीण
कोणाला तरी पाहिजे
लाडाची अशी एक लेक.
दिसतील तुला गं नक्की
माझ्यातील गुण अनेक
कोणाची तरी होईन मी
एकदम हक्काची मैत्रीण
जगू दिलेस मला तर असेन
मी कोणाची पाठराखीण
दिले मला आयुष्य तर
होईन मी तुमची शान
माझ्या सर्वच कृतींनी
वाटेल तुम्हा अभिमान
दाखवीन मी सर्वांना
माया ममतेचे हे रूप
गर्व माझा वाटेल आई
तुम्हाला नक्की खूप
असल्या बोलण्यावर
झाले सारे जण शांत
मुलगी नको का झाली ?
याची साऱ्यांच्या मनी खंत
