कल्पना धुक्यातल्या गगनसफरीची
कल्पना धुक्यातल्या गगनसफरीची
आकाशाच्या पायाखाली
मखमल रेशमी धुक्यांची....
त्यात जाणीव झाली ती
जगांच्या नाजूक स्पर्शाची...
धुक्याच्या मखमालीवर
जणू होते मी विसावले.....
विसाव्यानंतर सहजच
मेघांनी मिठीत घेतले.....
अंगास थोडा जाणवला
अवकाशातील गारवा.....
उत्साहाने नाचू लागला
मनमंदिरातील पारवा.....
धुक्याच्या मायेने सख्या
मीही थोडी भांबावले.....
भावनांच्या ओघातच रे
स्वर्गाचे दार मी गाठले.....
अशातच साथ ती होती
चंद्र आणि चांदण्यांची.....
कहाणी नव्याने लिहली
धुक्यातील गगनसफारीची....
धुक्यातल्या सफारीचा
वाटे मलाच रे तो हेवा....
स्वप्नातल्या गोष्टींचा
एकदातरी प्रत्यय यावा.....
गारव्यासोबत वाढली
मनातील माझ्या हुरहूर...
घरी जाण्याच्या ओढीने
भीतीचे माजले ते काहूर....
अशा गगनसफारीची
अनोखी झाली कहाणी....
धुक्याच्या मखमालीवर
फिरणारी मीच ती राणी...
