स्त्री कालची नि आजची
स्त्री कालची नि आजची


(अष्टाक्षरी काव्य)
नारी कालची, आजची
जरी नसली समान|
दोन्ही काळात भुमिका
निभावत गेली छान||१||
होता कालच्या नारीला
शिक्षणास प्रतिबंध|
केला शिकून स्वत:च
अन्य स्त्रियांचा प्रबंध||२||
अत्याचार अन्यायाच्या
विरोधात ती लढली|
नारी आज तिच्यामुळे
उंच शिखरे चढली||३||
असताना परिस्थिती
दोघींनीही प्रतिकूल|
कुटुंबाला शिकवून
सावरलं घरकुल||४||
दोघांनीही आपापले
सांभाळून घरदार|
मिरवले दिमाखात
झेंडे ते अटकेपार||५||