सशक्त मी
सशक्त मी
समजू नका मज अबला
असे समृद्ध भारताची नारी
आजही असे सशक्त मी
अजूनही तितकीच शूर मी
कर्तव्याची जाणीव ठेऊन
प्रसंगात नेहमीच तत्पर मी
शक्तीही मी, शारदाही मी
समजू नका मज अबला
आजही आहे सशक्त मी
प्रपंचात कधीच न ढासळता
वेळेस राहते खंबीर मी
जानकीही मी, जिजाऊही मी
समजू नका मज अबला
आजही आहे सशक्त मी
माजतो पृथ्वीवर अधर्म जेव्हा
जन्म पुन्हा घेऊन येते मी
दुर्गाही मी, कालीही मी
समजू नका मज अबला
आजही आहे सशक्त मी
विसरू नका तुम्ही जन हो
समाज घडवणारी मीच
होती हो सावित्रीबाई
मातृभूमीच्या सेवेस तत्पर जी
होती मीच मणिकर्णिका ती
लाखो अनाथांची आई झाले
मीच हो ती सिंधू माई
पीडितांची सेवा करणारी
आमटेंची मीच हो साधनाताई
समजू नका मज अबला
असे समृद्ध भारताची नारी
आज ही असे सशक्त मी
अजूनही तितकीच शूर मी
