सृष्टीचं मागणं
सृष्टीचं मागणं
सृष्टीच्या निर्मितीचे कारण तू, हे मानवा
सूर्य-चंद्र-ग्रह अन अगणित नक्षत्र-तारे
अनंत काळापासून तुझ्यासाठी फिरतात
तुझ्यासाठी ही वसुंधरा सजते, बहरते.
वैभव सारे अस्मानी अन अवकाशातील
दाहीदिशा धरणीवरती व्यापलेले
अन भू-गर्भातील खोल गहिरे
दिले हे आविष्कार तुला विधात्याने
दानात मिळालेले हे वैभव घेऊन
रचतो तू नवनवीन आविष्कार
साधतो प्रगती अपरंपार
समृद्धीसाठी तुझी निरंतर धडपड चाले
देतो जगण्यास रोज नवे आयाम.
हे मानवा, तुजपाशी मागणे एकच
मी जे निर्मिले तुझ्यासाठी अन
तू जे निर्मिले तुझ्याचसाठी
नाशवंत देह तुझा जरी,
नको विध्वंस या चराचरी
ज्या दोन हातांनी सारे साध्य केले
आगामी पिढीस हो हस्तांतरण हे
सदैव राहो तुझे प्रयत्न अखंडित
असो माझी-तुझी निर्मिती अविनाशी
असो तुझी-माझी निर्मिती अविनाशी
