सपान
सपान
सपान होतं गं माय
खूप खूप शिकायचं
झ्याक नोकरी करुन
तुम्हांस्नी सुख द्यायचं
जुन्या विचारांची झूल
का गं अशी पांघरली?
मला देऊनीया हूल
का गं लेक उजवली?
खटल्यात शेती वाडी
राब राब राबते लेक
घंटी वाजता फोनची
मूक होते तुमची लेक
सख्या माझ्या बघ कशा
शिक्षणाने मोठ्या झाल्या
काय बोलू सवे त्यांच्या
सा-या इच्छा करपल्या
उगवतो दिस माझा
राख स्वप्नांची वेचून
चुलीवाणी रातदिन
गेलं जगणं जळून
