सोडला प्राण
सोडला प्राण
माहित आहे तुम्हा आम्हाला
हुशार कावळ्याची कहाणी,
आज कावळ्याने जीव सोडला
करत पाणी पाणी.
तहानेने व्याकूळ कावळा
शोधात पाण्याच्या फिरत होता,
मिळेल कसे पाणी प्यायला
महादुष्काळच होता.
कुठेच मिळेना पाणी प्यायला
कासावीस तो झाला,
दुरुनच पाहिला माठ त्याने
जीवात जीव आला.
माठात नव्हते पाणी पुरेसे
होते अगदी तळाला,
खडे टाकून वाटले त्याला
मिळेल पाणी प्यायला.
खडे टाकून दमला,थकला
नव्हता देहात त्राण,
पाणी पाणी करत कावळ्याने
सोडला शेवटी प्राण...
तुम्हीच सांगा आडात नाही तर
पोहऱ्यात कोठून येईल,
पाण्यावाचून मराल सारे
अनर्थ सारा होईल.
