समतोल
समतोल
जन्म पंकात का दिला पंकजाला?
सौंदर्यास काटे दिले गुलाबाला
जीवनदायी जल देतसे का मृत्यूला?
विरोधाभास का जगी निर्मियेला? ।।१।।
सुखासवे दुःख येतसे मानवाला
अमृतासवे का मिळे विष प्याला?
प्रकाशासवे अंधार दाटलेला
विरोधाभास का जगी निर्मियेला? ।।२।।
हवे दात वदनी चणे खावयाशी
चणे ना मिळे दात असता मुखाशी
ताटात पक्वान्न मधूमेह झाला
विरोधाभास का जगी निर्मियेला।।३।।
उभ्या दारी असती मोटारी चार
तरी धावणे रे लागे कोसभर
असूनि सुखे ना मिळे भोगायाला
विरोधाभास का जगी निर्मियेला? ।।४।।
दुःख येतसे चव कळाया सुखाची
तमामुळे महती असे प्रकाशाची
महत्व मृत्यूच्या भये अमृताला
विरोधाभास का जगी निर्मियेला ।।५।।
उणे वा अधिक, कमी आणि जास्त
मिळे मानवास जगण्या सुखात
विरोधाभास ना समतोल साधलेला
म्हणोनि आनंद असे जीवनाला।।६।।
