सल
सल
सांग सजणे कुठला
सल मनात सलतो
झरझर अश्रूधारा
सवे गाली ओघळतो
सल दुःखे प्रयासाने
अंतरात का दाबसी?
उफाळून येते कधी
कळ वेगाने मानसी
कधीतरी जवळीक
करुनिया तू सांगावे
मनातले मळभाचे
नभ मोकळे करावे
सोशिकता धर्म असे
जरी नारीचा तरीही
किती सोसावे तयाला
कसे बंधनचि नाही?
आता पुरे हे साहणे
खांद्यावरी टेक माथा
प्रेमी विश्वासूस सांग
तुझ्या मनातल्या व्यथा
जेव्हा होईल निचरा
सल दुःखाचा मनीच्या
भासे हलके फुलके
खगापरी अंबरीच्या
