शुभास्ते पंथानः
शुभास्ते पंथानः
जीवनाचे वरदान
देई ईश्वर मानवा
पूर्वप्राक्तनांनुसारे
करी ईश्वर योजना
प्रवासाची वाट असे
कधी मऊ हरळीची
कधी कंटकांची दाटी
कधी वाट वळणांची
कधी सुखांचा वर्षाव
कधी चांदणगालिचा
कधी दुःखाच्या खाईत
क्षण अश्रूप्रपाताचा
वाट बिकट असता
हात मदतीचा देई
संकटात खरा मित्र
आस्था प्रेमाने वागवी
नशिबावरती भार
चाले प्रवासी नादात
सुखदुःख एक त्याला
नसे कशाची ददात
मार्गावरी जिवलग
सखे सोबती असती
प्रेम माया आपुलकी
मार्ग सुकर करती
वाट आगळीवेगळी
ईश्वराने योजलेली
कधी थांबवी प्रवास
अज्ञातचि मानवासी
