शीर्षक रंग मनाचे
शीर्षक रंग मनाचे
अवखळ तरल , अतल मन्मना , कसे तुला मी जाणू?
शब्दकुंचल्याने तुझे रंग मी, आज पाही रंगवू (1)
पर्जन्याने हर्षित सृष्टी , वसुंधरा सुखावते
हिरवी झाडे- हिरव्या वेली ,
मन माझे मोहरते (2)
रवि उगवता , रंग केशरी
शब्दकुंचले वर्णू किती ?
उत्साहे कार्यान्वित करी
तन -मन येई फुलारुनी (3)
नितळ खळखळ मन्मन
प्रपातापरि कोसळते
शुभ्र- धवल किती तुरे
मना- मनांमधी डोलतसे (4)
मावळतीचे रविबिंब
नारिंगी क्षितिजावरी
अधिर प्रेमी युगलांना
संध्यानंदाने डुलवी (5)
धवल चंद्रकिरणांतुनी,
रजनीगंधा दरवळते
प्रीत मनीची येता फुलुनी
मधुमीलन सुखावते (6)
रंग तुझे जळापरि , वेळ भेटता जशी जिथे
तत्क्षणी तू विरघळसी,
दुग्धशर्करेपरि त्वरे (7)