शहरात आला माकड (बालकविता)
शहरात आला माकड (बालकविता)
शहरात आला माकड एक
हरखला पाहून शहराची मेख.
रंगीत लोक, रंगीत गाड्या
टुमदार घरे, उंच उंच माड्या.
मोठी मोठी दुकाने,मोठे मोठे माॅल
रस्त्याच्या दुतर्फा छान छान स्टाॅल.
कुणाचे ऑफिस,कुणाची शाळा
धावपळ साऱ्यांची जपतांना वेळा.
पी पी रहदारी,पो पो आवाज
' कोण पुढे पळे तो ' हा इथला रिवाज.
रुंद रूंद रस्ते, उड्डाण पूल
साऱ्यांनाच पडली शहराची भूल.
शोभेदार चौक, सुशोभित बागा
पशु पक्ष्यांना राहायला नाही कुठे जागा.
माकडालाही आवडले देखणे शहर फार
मुक्काम येथे करू म्हणे दिवस दोन चार.
फिरुन फिरुन आता दमले माकड
डोळ्यावर त्याच्या येऊ लागली झापड.
विश्रांतीसाठी कुठे मिळाली नाही जागा
माकडाने जंगलात धूम ठोकली बघा.
