शाप गरीबीचा
शाप गरीबीचा


जन्म घेणे नाही हाती
दैवदत्त लाभतसे
मोठा शाप गरीबीचा
जन्मतःच मिळतसे (१)
चणचण सगळ्याची
चिडचिड नेहमीच
रक्तवर्ण ही कमळे
येती चिखलामधीच (२)
नसे कौतुक, ना लाड
मनी कष्टी हो माऊली
नशीबचि येते आड
गर्द दारिद्र्य सावली (३)
बुद्धिमान अपत्यांनी
केले युद्ध संकटांशी
अग्रक्रम शिक्षणासी
झुंजुनिया गरीबीशी (४)
झळकून गुणवत्ता
झाले अग्रमानांकित
दर्जा जनमानसात
उच्चभ्रूंच्या पंगतीत (५)