साथ जीवनाची
साथ जीवनाची
पुरून उरतो श्र्वास एकही, पुरून उरते नजर |
श्रावणीला फुलांचाही, पुरून उरतो बहर ||
नको मनोरे आकांक्षांचे, नको गुलामी स्वप्नांची |
तळहातावर रेघ नको, अन् नको सलामी गगनाची ||
एकचि क्षण दे, वात्सल्याचा, अन् मायेचा स्पर्श दे |
पाणी डोळां कधी कधी, तर कधी भाबडा हर्ष दे ||
कशास मागू ग्रह तारे, अन् कशास मागू खुणा |
ह्या जगाच्या रहदारीचा, मी तर केवळ पाहुणा ||
हास्य चिमुकले ओठांसाठी, मदतीसाठी हात दे |
अंधारातून वाट काढता, आप्तेष्टांची साथ दे ||
नको कुण्या पैश्याची उर्मी, नको धनाच्या खाणी |
आचारात या विचार दे, अन् ओठी मंजुळ वाणी ||
नको नुसतेच पळणे पडणे, मनास या उसंत दे |
नकोच सारे मनाप्रमाणे, तुला जे पसंत, दे ||
वादळवारा श्रावणधारा, ओल जपावी नात्यांची |
बाकी काही नको जीवना, फक्त साथ दे जीवनाची ||
