जखमांची गाणी
जखमांची गाणी
त्या मिटून पाकळ्या अलगद, डोळ्यांच्या, गेला कोणी |
त्या दिल्या घेतल्या ओल्या, जखमांची झाली गाणी ||
ते वेडच होते वेड्या, श्र्वासांचे अडकत जाणे |
तव हात घेऊनी हाती, त्या धुक्यात चालत जाणे ||
ते घरटे आपण अपुल्या, प्रेमाने बांधियलेले |
त्या उबेत होते मारव, तू हळूच पांघरलेले ||
त्या शुभ्र तळ्याशी आपण, रंगांनी भरली दुनिया |
त्या मिठीत तुझिया माझी, थबकली होती काया ||
ते गेले पडले सारे, क्षण अंधुक अंधुक झाले |
आशांचे भोळे पंख, बघ क्षणात विखरून गेले ||
ती गेली दुनिया वाहून, राहिले कोवळे पाणी |
त्या दिल्या घेतल्या ओल्या, जखमांची झाली गाणी ||
