सागर आणि आभाळ
सागर आणि आभाळ
असू दे कितीही विशाल सागर,
त्याला नदीला भेटायला येणं जमलंय का?
मावळत्या सूर्याने त्याच्या उजेडाला,
रात्रीच्या अंधाराला मिठी मारताना थांबवलंय का?
माती आहे जमिनीवर म्हणून,
पाणी कधी आकाशाकडे धावलंय का?
डोंगरांना आहे आभाळाची उंची,
पण म्हणून झाडांना कुरुवाळणं सोडलंय का?
विहाराचा आनंद घेतात पक्षी,
म्हणून घरट्याची ओढ संपलीये का?
नावेला डोलावताना मृत्यूची भीती,
म्हणून पाण्याशी नातं तुटलंय का?
ढगांना नाही येत रंगांमध्ये रंगणं,
पण म्हणून इंद्रधनुष्याशी बरोबरी केलीये का?
अहो..! जग खूप मोठं आहे,
खोट्याच्या जगात खरेपण जपणं सोप्पंय का?
दोष देत राहतात सगळेच एकमेकांना,
स्वतःच्या मनाला प्रत्येकाने आरसा केलाय का?
यायला हवं... यायला हवं स्वतःला आरसा दाखवणं,
आपल्या माणसांना ते आहेत तसं स्वीकारणं,
स्वत:साठी स्वप्नांची कवाडं मुक्तपणे उघडणं..
जमायला हवं स्वतःसाठी आणि इतरांसाठीही,
योग्य त्या वेळी सागर आणि योग्य त्या वेळी आभाळ होणं..!
