तिचा कृष्ण..माझा कृष्ण..
तिचा कृष्ण..माझा कृष्ण..
आपलं आणि होडीचं...
जरा सारखंच असतं नाही...?
म्हणजे कधी दिशा हरवेल,
याची काहीच खात्री नाही...
विचारांचं मळभ दाटून येत असतं,
कधी बरसून येईल ह्याने सतत साशंक...
तरीही दिशा हुडकायची..
नजरेला ठाव घेता येत नसलेल्या किनारपट्टीची...
बुडण्याची भीती असते प्रत्येक क्षणाला..
पण डोलावत-गोते खाणं...
म्हणजे शेवट नक्कीच नाही..
गगनातलं चांदणं वाट दाखवत असतंच म्हणा,
पण आपण कुठे विसंबून असतो त्यावर...?!
पहाटेचा सूर्य त्याची जागा घेणार हे..
ठाऊक असतंच की आपल्याला...
पण तुफानात चांदणं आणि सुर्यसुद्धा,
होतात हतबल.. कारण प्रत्येकावर येतं राज्य..
या जन्म-मृत्युच्या खेळात....
तेव्हा कुणीतरी मार्ग दाखवणारं हवं,
हातात हात देऊन सावरणारं हवं...
नौकेला आहे तसा साथी...
तिचा तिनेच ठरवलेला... होकायंत्र..!
संकटकाळी तिचा कृष्ण होऊन,
पैलतीर गाठायला मदत करणारा...
मलाही माझ्या आयुष्यातला कृष्ण ओळखायचाय..
मी शोधत आहे त्याला बाहेरही आणि आतही...
भावनांच्या सागरात, मी सैरभैर....
माझा कृष्ण भेटेल मला... या आशेवर...!
