रंग पांढरा
रंग पांढरा
रंग माझा वेगळा हा
सर्व रंगात मिश्रित
मनोभावे मैत्री करे
ढंग न्यारा संगतीत.......॥१॥
मला पांढरा म्हणती
रूप माझे गोरे गोरे
अहंकार विरहीत
माझे मनाचे मनोरे.......॥२॥
कांती धवल सुंदर
साधेपणा माझ्या अंगी
रंग कोणताही असो
मिसळते सर्वासंगी.........॥३॥
मनी शुद्धतेचा वास
निर्मळता तळाकाठी
दयाभाव, आपुलकी
पाझरते सर्वांसाठी..........॥४॥
ठायी गडद शांतता
नसे जरा कुजबुज
निरंकार समाधानी
देही विश्र्वासू बुरूज.........¡¡५¡¡
