शब्दांचा धागा
शब्दांचा धागा
धागा शब्दांचा घेवुनी
विणू कवितेचे जाळे
प्रकाशीत करू वाटा
सारूनिया सारे काळे.........! १!
मतितार्थ जीवनाचा
घेऊ समजून आता
मांडू काव्यस्वरूपात
जागरूक दिनराता.............! २!
संघर्षाच्या दाहीदिशा
शब्दांकित करू आज
रचूनिया भावगर्भी
प्रेरणेचा मर्म साज.............! ३!
मागितले नाही काही
कवीमन हे उदार
असे डोळस नजर
भान सामाजिक फार...........! ४!
शब्दांचा धागा असा
आयुष्यास विणी खरे
समर्पित करू पाहे
अनुभवी खोल झरे.............! ५!
