रक्षाबंधन
रक्षाबंधन


रक्षाबंधनाचा सण, बहीण माझी मोठी ताई
तो रेशमाचा धागा, बांधता तिला होते घाई
तिच्या पापण्याही ओल्या, या कोरोनात भाऊ येतो की नाही
आठवण भावाची होता, सासरी कोपऱ्यात रडते ताई
भाऊ मी तिचा, आज आठवण होत आहे
येईन मी कसाही, तू रडू नको ताई
तुझा रेशमाचा धागा, वर्षभर रक्षण माझे करतो
या लोचनात साठवलेला, ताई तुझा चेहरा आज स्मरतो
गुणी माझी ताई, ती चांदण्याची दाटी
येईन मी भेटीस तुझ्या, काढ आरती अन् प्रसादाची वाटी
या हृदयातील वेदना, कशा सांगू आज तुला
तुझ्या आठवणीत ताई, गळा माझा रुंधला
आठवण तुझी येता, पाझरे डोळ्यातून पाणी
तुझेही असेच हाल असतील, दिसते मला तुझी भिजलेली पापणी
थोडा धीर धर आता, येणार रक्षाबंधनाला
पहारे चौक्या असो कितीही, मी चुकविन त्या तुला भेटण्याला
देतो शब्द तुला ताई, रक्षणाचा विडा मी उचलला
होवो आज काही, ताई येतो रक्षाबंधनाला