रात्र पानावर झिरपत होती...
रात्र पानावर झिरपत होती...
रात्र पानावर झिरपत होती,
उदास पानांना कुरवाळत,
वाऱ्यावर झुलवत होती...
रात्र काळी काहीशी,
काळवंडत होती ,
हिरवळ पानाची,
अस्तित्व विसरली होती...
वेडी रात्र बहरून,
चांदणे फुलवत होती,
सांडता पानावर चांदणे,
पाने सुखावत होती...
ओसरत चालली रात्र,
हात सोडत होती ,
पाने शहारतांना पाहून,
हळूच हसत होती ...
हळदीने माखलेली पाने,
रात्र विसरली होती ,
धरून हात पहाटेचा,
खळखळून हसली होती...
रात्र पानावर झीरपत होती,
उदास पानांना कुरवाळत,
वाऱ्यावर झुलवत होती...

