रानगंध
रानगंध


रानगंध
येता पावसाच्या सरी
रान होई ओलंचिंब
बीज भूमीत लपले
फूटतसे त्याला कोंब ।।१।।
आला तरारून कोंब
बाळ तरूचे गोंडस
दिसे जणू हरिणीचे
गोड गोजिरे पाडस ।।२।।
सृष्टी अमृतात न्हाते
जागा होती सुका पाला
चहूकडे हिरवळ
देती सुख नयनाला ।।३।।
जिथे तिथे पाणी पाणी
पिके हालती डोलती
हात हातात घालून
जणू प्रेमगीत गाती ।।४।।
कृमी कीटक जागती
खेळ आनंदे खेळती
गवताच्या पातीवर
फुले रंगीत डोलती ।।५।।
थेंब पावसाचा जेव्हा
काळ्या मातीत पडतो
येतो मातीला सुगंध
जीवा सुखावून जातो ।।६।।
रान ओले ओले झाले
झाडे, वेली सुखावली
रानगंध दरवळे
काया कशी मोहरली ।।७।।