पुन्हा निर्भया..पुन्हा प्रियांका....
पुन्हा निर्भया..पुन्हा प्रियांका....
लाट उसळली संतापाची विचार आता काय
कापून टाका नराधमांचे हात आणखी पाय
वखवखलेले विकृत आता दिसतील जेथे जेथे
ठेचून टाकू हीच शपथ मग करू या खरीच तेथे
षंढ कायदा गेंडा शासन म्हणुनी गुन्हा पुन्हा हा
भीती घालतो रोजच हल्ली रस्ता सुना सुना हा
रोजच निघती हल्ली मोर्चे घेऊन हाती दिवे
दात विचकती मोर्चालाही नराधमांचे थवे
किती प्रियांका किती निर्भया या देशी मेलेल्या
किती अनामिक कळ्या बिचार्या शिकार अन केलेल्या
सन्मानाच्या रोज घोषणा वाचून महिला हसते
गल्ली,दिल्ली, शाळा, रस्ता सर्वत्रच ती फसते
तूच हो आता झाशीवाली करण्यासाठी वार
नराधमांना दाव तळपत्या समशेरीची धार
