पुन्हा कधी भेटणार
पुन्हा कधी भेटणार
अशी कशी अचानक, गेलीस निघून ।
वाऱ्यावर लेकराला, गेलीस टाकून ।।धृ।।
लहानाचा मोठा झालो तुझ्या सावलीत
कुठे कुठे शोधू तुला, कुण्या कोठडीत
तुझ्या जाण्यामुळे आई, गेलो भांबावून ।।१।।
तुझ्या भेटीसाठी जीव, होई कासावीस
काय चुकले बाळाचे, का गं रुसलीस
झाली काही आगळीक, घेई सावरून ।।२।।
तुझ्या रांगड्या हाताचा, स्पर्श आठवतो
पोटी भूक तरी मुखी, घास अडकतो
खाता खाता हात माझा, घेतो आखडून ।।३।।
आईविना लेकराला, कुणाचा आधार
सांग आई आता पुन्हा, कधी भेटणार
डोईवर हात ठेवी, एकदा येऊन ।।४।।
