प्रतिक्षा बळीराजाची
प्रतिक्षा बळीराजाची
मन झाले हो चिंतित
आता शिवार तापलं
लई भेगाळली भुई
द्येवा कवा गंधाळलं ? (1)
लागे नजर आभाळी
जाती नक्षत्रे कोरडी
नद्या विहीरी आटल्या
पिके पडली उघडी (2)
फक्त एक मार्ग दिसे
मला आता सुटण्याचा
फास घेताच सुटेल
प्रश्न आयुष्यभराचा (3)
गुरेढोरे भुकेलेली
पोरं चेहरे टाकून
अशामधी मृत्युसुद्धा
कसा घेईल वेढून ? (4)
आतुरता पावसाची
देवा कशी सांगू झाले
कर वर्षाव रे आता
प्राण कंठाशीच आले (5)
येता पावसाच्या सरी
पीकपाणी बहरेलं
वर्षभर आबादानी
कष्ट फळाला येईलं (6)
देवा वरुणराजा तू
होई प्रसन्न आम्हांला
उतराई कृषीवल
प्रेमे आर्जवे तुजला (7)