पर्जन्यसूक्त
पर्जन्यसूक्त
बांगड्या किणकिणाव्या
तसा येतो आहे
झाडांतून
काही पक्ष्यांचा आवाज
काही झाडे
आपले फुलोरे जपत
तशीच स्तब्ध उभी आहेत
त्यांनाही
वाऱ्यासोबत,
ढगांसोबत भिरभिरणे
आवडले असते
पण तरीही
उभी आहेत ती
गर्भार कळांनंतरचे
मूक सौन्दर्य सांभाळत
चाफा,
त्यापलीकडची
तीन घनगर्द झाडेही
न्याहाळत आहेत केवळ
आला-गेला क्षण
काही वेली
विखरून सांडल्या आहेत
आसपासच्या भिंतींवर
सत्यभामेला मोह पडावा
असा प्राजक्त टपटपत आहे
शेजारच्या घरी
दूरवर कुठेतरी
पाऊस पडत असावा
विव्हल मदनिकेसारखे
उमटणारे त्याचे
नाजूक नाद
संमोहित करीत आहेत
थकल्या-भागल्या मनाला
कालिदासाचा मागोवा घेत
आभाळ वाहू लागलंय
किरणांचे ताटवेही फुलताहेत
पर्जन्यसूक्त गाताना
आणि,
काहीच अशक्य नाही
असे जाणवून जाते क्षणभर
जीव लख्ख पालवतो !!
