प्रेम वेडा
प्रेम वेडा
मी पांढरा शुभ्र आकाश
काळी तुझी काया
किती पायदळी तुडवतात गं तुला
तुझी येते खूप मला दया......
माहित आहे गं मला
तुझं माझं मिलन आहे अशक्य
म्हणून वेगवेगळ्या ऋतूत
स्पर्शून जातो होईल तेवढे शक्य.....
लोकं म्हणतात मला
मी पाऊस खूप पाडतो
अगं पाऊस नाही तो
तुझ्या विरहात अश्रूंचा पूर गाळतो.....
सृष्टी जेव्हा हिरवा शालू नेसते
तेंव्हा तू नववधू गत दिसतेस
मी ही इंद्रधनुष्याचा सप्तरंग नेसतो
तेव्हा तू टक लावून मला पहातेस.....
थंड गारव्यात टिंब टिंबणा-या
चांदण्यांचा शाल पांघरूण जातो
सकाळच्या कोवळ्या उन्हाचा
आल्हाददायक ऊब तुला देतो......
माझी नजर लागू नये म्हणून
अमावस्येच्या चंद्रात तुला झाकतो
तर कधी पौर्णिमेच्या चंद्रात
डोळे भरून तुला मी पाहतो........
तुझ्या प्रेमात तहानलेला असतो
तेंव्हा तुलाही मी देतो दगा
उन्हाच्या रखरखतेने पडतात
तुझ्या शरीराला सगळीकडे भेगा.....
जे प्रेमात पडतात त्यांच्या सारखं
मी ही आहे गं तुझा प्रेम वेडा
अवखळ गारा पाडून
कधी कधी करतो खूपच राडा.......

