प्रारब्ध
प्रारब्ध
जीव लावला ज्यांस
तेच जीवावर उठले
घरट्याच्या पिलांना
पंख अकलेचे फुटले।।
प्रपंचाची काळजी करता
तीळतीळ काळीज तुटे
कोण कुणाचा कसले नाते
आज वेड्या मनाला पटले।।
विसरले रक्तास हे रक्त
स्वकीयांनी मज लुटले
कशास लावू ठिगळ आता
आभाळच जिथे फाटले।।
काळोखाचे दिवसा ढवळ्या
धुके भवताली दाटले
दिवा लावला उजेडास्तव
घर दिव्यानेच पेटले।।
स्वार्थाच्या दुनियेत मजला
सारे मतलबीच भेटले
दशक्रियेचे जेवण जेवण्या
डोमकावळे सारे टपले।।
