फुलपाखरू
फुलपाखरू
वाटते कधी चाखावा पुष्परस होऊनी फुलपाखरू मुक्तल,
नानारंगी फुलांवरी बागडताना व्हावे निसर्गाचे सम्राट अनभिषिक्त !
कधी गुलाब, कधी जाई तर कधी शोषावा प्राजक्त ,
प्राशिता लालबुंद जास्वंद मम सर्वांग व्हावे आरक्त !
दिनभरी क्रीडा करिता नानाविध वृक्ष - वल्लरींवरी ,
सुखांच्या अन् आनंदाच्या मजवरी कोसळोत धुंद सरी !
हळूच मग यावी पेंग इवल्याश्या माझ्या नेत्रांमध्ये ,
घ्यावा वाटे पुष्पवाटीकेत विसावा भरण्या नवचेतना गात्रांमध्ये !
मुक्त मग या फुलपाखराने मग अलगद सामावून जावे वृक्षाच्या कुशीत ,
अन् नवदिवशी पुन्हा उघडावे नेत्र नव्या जोमाच्या खुशीत !
