पावसाळी रात होती
पावसाळी रात होती
वादळी बरसात होती पावसाळी रात होती
साजणी बाहूत माझ्या रातच्या स्वप्नात होती
एवढा बेभान झालो काळजाचे हाल झाले
झिंगलो कैफात जादू गोड आवाजात होती
गंध ज्वानीचा सखीच्या सांडला सर्वत्र होता
मोगऱ्याची खास वेणी माळली केसात होती
पाहण्या माझ्या सखीला चंद्रही आतूर होता
द्वेष ताऱ्यांनी करावा ओढ तारुण्यात होती
माय गेली बाप गेला पोरगी लाचार झाली
आग पोटाची विझवण्या थेट बाजारात होती
चेहरा खोटाच होता सज्जनाचा लावलेला
राक्षसी वृत्ती तयाच्या लपलेली आत होती
आटले का प्रेम आई कापते गर्भात कन्या
*पंडिता* शक्ती किती मायच्या प्रेमात होती
