पावनखिंड
पावनखिंड
स्वराज्यभूवर अरिष्ट मोठे, येऊन होते ठाकले
पन्हाळी महाराज होते, वेढ्यात सिद्धीच्या गुंतले
श्वेतवर्णी चंद्रास नभांगणी ग्रहण होते लागले
सहा शत बांदलांसह महाराज विशाळगडी चालले
सोडून पन्हाळा महाराजांनी, सिद्धीचा पाश पाठी टाकला
मस्तवाल तो मुघल बिचारा, मद्य प्राशित राहिला
खबर द्यावया महाराजांची, सिद्धीचा हेर एक धावला
फौज पाठवा पकडून आणा, सिद्धी बरळत काही राहिला
कैद करण्या त्या नरसिंहा, फौज मोठी निघाली
अन कैद करूनी महाराजांना, सिद्धीसमोर ठाकली
छद्मी हसून एक घटिका, मसूद पाहतच राहिला
कर्दनकाळ यवनांचा, त्याच्या कैदेत होता बांधला
शिवबा नव्हे हा म्हणून, मसूदचा हशम एक बोलला
क्रुद्ध होऊन कोण अरे तू, सिद्धी त्यावर गरजला
कटी ठेऊन हात दोन्ही, सिद्धीवर तो हसला
शिवा काशिद नाव माझे, हसतच तो वदला
पाठी मसूद वर पाऊसधार, गड तीन मैल दूर
बांदलांसह तीन शत खिंडीत ठाकला बाजी धुरंधर
निश्चिंत जावे महाराज आपण मी उभा आहे जोवर
ना ओलांडेल गनिम एक घोडखिंड टीचभर
वीरभद्र हा शिवबाचा, गनिमा वीजेसरशी भिडला
पाहून रौद्ररूप बाजींचे, मसूद होता थरथरला
क्षणात काही खच प्रेतांचा, खिंडीत होता उरला
तीन शत अन चार सहस्त्र, संग्राम निराळा रंगला
शिवा काशिद अन कैक जणांचे, होते रक्त सांडले
लढत होते जितके तेही, घायाळ होते जाहले
एकवीस तास धावून पालखी, विशाळगडावर पोहोचली
तोवर होती बाजीप्रभूंनी, घोडखिंड रोखली
लागलीच मग बाजींसाठी, तोफ इशारतीची झाली
पण बाजींसाठी आले होते, वैकुंठयान खाली
तोफ ऐकून इशारतीची, त्यांनी आनंदाने डोळे मिटले
मुजरा करीत महाराजांना, त्यांचे थकलेले शरीर थिजले
घोडखिंडीवर त्या रात्री, रक्ताचा अभिषेक झाला
पावन झाला स्वाभिमानी रुधिराने, एकेक पाषाण तेथला
अनमोल हिरा स्वराज्यभूचा, होता तेथे हरपला
बलिदानातून अनेक अशाच, स्वराज्याचा सूर्य उगवला