पाऊस
पाऊस
आकाश आले भरूनी
काळे मेघही दाटले
आकाश नभी पाहतो
मन आनंदी जाहले.. १
मेघ करती आवाज
जणू भांडती नभात
मेघ सजला अंबरी
गाभारा सजला आत.. २
शामल ढग गगनी
काळोख दाटे घरात
शामल एकटी घरी
भिती दाटली मनात .. ३
नाद आला धरेवरी
चराचरात घुमला
नाद लागला सार्यांना
जो तो मनी भाळलेला .. ४
पिसे पसरून पक्षी
घरट्यात विसावले
पिसे लागले त्यांनाही
मजेने नभी उडाले .. ५
गंध आला मातीचाच
पहिल्याच पावसाने
गंध लावीला धरेला
जणू त्या थेंबाथेंबाने .. ६
सर आली जोराचीच
सारी धरा चिंब ओली
सर घातले पानांना
माळेने सजे अबोली ... ७
तीर भरला पाण्याने
गंगा वाहते जोशात
तीर मारला ढगांना
शेत वाढले तोर्यात ... ८
आकाश ... नभ , मुलाचे नाव
मेघ ... ढग , घुमट
शामल ... सावळा , मुलीचे नाव
नाद ... आवाज , छंद
पिसे .... पंख , वेड भरणे
गंध ... वास , टीळा
सर ... पावसाची , माळ
तीर... नदीकाठ , बाण
