ओंजळ
ओंजळ
बघितलं तर आपल्या अनेक कृतींशी अन्
भावनांशी ओंजळीच घट्ट नात असतं
मनाच्या तळाशी दडलेल्या अनेक भावनांचे कल्लोळ
ओंजळीत पेलता येतात आणि जीवनातील सुख-दुःख आशा-आकांक्षा ओंजळीतच तर सामावतात...
दिसायला छोटीसी पण कार्य करते मोठी मोठी
स्विकारायला लागते तशीच द्यायला लागते
कधीच रिती होत नाही...आयुष्याच गणित कधीच कळत नाही...कधी कधी न मागता खूप काही मिळत आणी कधी कितीही विनवण्या केल्या
तरी ओंजळ रिकामीच ठेवत..
विविध रूपात तिच स्वरूप आपल्याला बघायला मिळत....
✨आईच्या ओंजळीत फुलतात जन्मभराची आनंदाची फुले
सुगंध त्याचा भरून जीवनी सुखावतात तिची मुले
✨रम्य ते बालपण,आठवण किती गोड
गप्पा गाणे गोष्टी खायला पण मिळे गोड
चिंच, बोरे आवळे ठेवी राखूनी
प्राजक्ताची फुले सखी देई ओंजळ भरूनी
✨रोज उगवता सूर्य न्यायहाळणे नशीबच
नवलाई जीवनात समाधानी आनंदच
शोध सुखाचा लागता हसू येईल ओठांवर
देता निस्वार्थपणाने दान द्यावे ओंजळभर ...
✨धावती स्वप्न सारी आशेच्या पाऊली
क्षणोक्षणी आयुष्य, स्वप्नांची गर्दी
ओंजळीत जोडूनी घेवूया ही
कष्टाच्या धाग्याशी, होती मग खरी स्वप्न आपली
प्रामाणिकपणे घेता येईल गरुडभरारी
गरीबीतही स्वाभिमानी, संस्काराचे फुले असावी आचरणी
दारी सत्कर्माची वेल फूलता फुले उमलतील समाधानाची
फुले वेचतांना ओंजळ भरेल सुखांनी
श्वाश्वत आहे सुख हे पुंजी सारया जीवनाची
न संपणारी ओंजळ ती आत्मिक सुख समाधानाची
न सुकणारी फुले ही सत्कर्माच्या सुगंधाची
बहरून टाकेल जीवनाला
बरसात करेल सुख- समृद्धीची....
✨वडिलांनीही आयुष्यात अविरतपणे कष्ट करून
ओंजळ का होईना सुख सगळ्याना वाढलं
संघर्ष विना जीवन नाही धिराने लढ अशा त्यांच्या विचारानेच माझं आयुष्य वेधल
कन्यादान करतांना सर्व जणू ते हरले
अश्रूंना आखून दिली लक्ष्मण रेषा नयनांची
पण कसं सांगू म्हणून अंतरी खूप रडले... माहीत होते परक्याचे धन तरी स्वतःला कुबेर समजत होते आज मात्र कन्या दान करून रिती ओंजळ पहात होते...क्षण सारे
निसटले त्या वाळूसारखे ..तशीच ओंजळ चेहऱ्यावर ठेवुन अश्रु लपपून दाखवत होते हसल्यासारखे...
✨ भातकुली केली दूर माप दुसऱ्या अंगणी ओलांडले जाणिवांच्या ओंजळीत स्वप्न संसाराचे मग थाटले..
प्रेमळ असे सासर उमेद मिळाली जगण्याची
आई बाबांची माया तशीच सासू सासरयांची
सुंदर हसरया संसारात सोबत सख्याची, साथ ही मिळाली प्रेमाची
आठवणी सारया धूसर झाल्या सरिता वाहे आनंदाची
अंगणी कधी अशी सांज येई
सोनपिवळ्या किरणांनी मोहरलेली
ओंजळ माझी सुखांनी भरलेली....
✨ ओंजळीत कुसुमांचा वर्षाहून पडाव
आयुष्यात प्रेमळ आपुलकीच्या माणसांसाठी कधीही अंकुश मात्र नसाव अन् सुखदुःखांच्या सरींना अलगद मिठीत घ्यावं वाटलं तेव्हा एकमेकांशी कधी हितगूज करावं नात्यात कधीही कुठलच अंतर मात्र नसाव देता येत असेल तर समोरच्याला ओंजळ भर का होईना सुख द्याव
खूप सारे आशीर्वाद ईश्वराचे नाव असावे सदैव वदनी
उरो ना कसली निराशा नित्य घडो सेवा
अजून दुसर काय हवं ह्या जीवनी....
✨ क्षण असतात काही हवेहवेसे मनाच्या कप्प्यात जपलेले
माणिक मोती जणू आवडीचे निवडलेले
आनंदाने मग उघडावा कप्पा तो आठवणींचा
खजिना तो क्षणांचा ओंजळीत भरून घेताना
हर्षाने वेड होतांना वेचून घ्यावं त्या एक एक क्षणांना
जन्म नसावा नुसता जगण्यासाठी
नाते मनामनातील असावे ओंजळ भरण्यासाठी
✨मनातील भावना एकवटूनी
भरली मी शब्दांची ओंजळ
त्या शब्दांनी दिले मला लेख कविता रचण्यास बळ
ओंजळीतले शब्दांचे मोती मनाचा कधी ठाव घेती
रवी, शशी, नभ सारे अंतरीचे मज भाव सांगती
देऊनी त्यास रूप शब्दांचे अलगद
ठेविले ओंजळित मोती
विचारलं मला जर मी काय कमावले....?
या शब्दांच्या ओंजळीत विश्व माझे सारे सामावले
✨शब्द शब्द गुंफतांना शब्दच काहीसे माझे झाले
लिहिण्यास प्रवृत्त त्यांनी मज आज केलेस...
✨आयुष्यात ओंजळ भर का होईना मनसोक्त जगून घ्यावं मन अंतरीचे भाव बोलती
मन बोलेल कदाचित, उघडले
जर ओंजळीतील मोती ...🙏😊
