ओढ
ओढ


तू नेमका कोण आहेस?
कसा आहेस? का आहेस?
आहेस की नाहीस?
हा भास की जगण्याची ऊर्मी?
की दुर्दम्य इच्छाशक्ती...?
कसं सांगू?
परडीत फुले वेचावीत तशी
वेचत जाते तुला प्रत्येक क्षणात....
अंगाखांद्यावर मिरवते
त्या सुगंधी शब्दमाळा...
मग धुंद दरवळतो
काळजाचा गाभारा...
गंधाळतो श्वासांचा
मोरपंखी पिसारा....
अवकाशाला तारका
जिवंतपणा देतात
प्रकाशाने,
आपलं अस्तित्व
वाढवत नेतात कणाकणाने...
तूही त्यातलाच एक... तारा...
दूर... चमचमणारा
काही अनवट माणसं असतात,
आपली आपण वाढणारी
आपल्या मस्तीत जगणारी
त्यातलीच एक मी...
कल्पनेनेच भारून जाणारी...
आपल्याच आकाशाला हरक्षणी
अधिकाधिक उंच करत जाणारी!
आपलंच वर्तुळ, आपलीच त्रिज्या,
आपलीच परिमिती सांभाळत...
भूमितीचा आकृतिबंध न तोडता
अलगद आयुष्याचं समीकरण
लिलया सोडवणारी.....
ह्या द्वैतअद्वैताची भिंत ओलांडून
मनपटलावर एक इवलीशी
कलाकृती साकारते...
सत्यम..शिवम...सुंदरम,
सगळं काही तुझ्यामाझ्यात असतं,
सगळं काही तुझ्यामाझ्यात घडतं.
वाळूसारखा एकेक क्षण निसटत असला
तरी अलगद मनात बंदिस्त होतो कायमचा...
भरभरून जगण्याच्या ओघ...
वेडावून टाकतो, कवेत घेतो,
लोक वेडा अट्टाहास करत राहतात,
आनंद समाधान शोधण्याचा,
मी?... मी आनंद घेत राहते,
जीवनाच्या रंगमंचावर रोज...
मी तुझ्यात तू माझ्यात सापडण्याचा...!