STORYMIRROR

Rani More

Others

3  

Rani More

Others

कागद कोरा

कागद कोरा

1 min
1.0K

भरून आलेलं मन जसं

मळभ

आलेलं आभाळ,

कोसळायचयं,रितं व्हायचयं

पण कुठे?

सापडतच नाही किनारा.

कोंदटलेली कुंद हवा नि

घुसमटलेला निशब्द श्वास.

बराच वेळ बसले अशीच

हातात कागद-पेन घेऊन…


सुचतच नव्हते काही

मनाच्या आकाशात एवढी गर्दी मेघांची

पण काही केल्या बरसेना पाऊस

खेळत राहिला उनाड वाऱ्यासारखा…

शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन

घट्ट मिटुन घेतले डोळे

तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर


तुझ जपणं आठवलं

तश्या उमटून गेल्या झरझर

शब्दांच्या सरींवर सरी

मलाही मग आला उत्साह

खोल खोल डोकावत गेले अंतरंगात

तसे तरंगत आले सारे लपलेले शब्द


आणि बरसु लागले अखंड

मिटल्या डोळ्यातून श्रावणसरीसारखे

मग आठवल्या त्या कातरवेळा

जन्मभराची साथ देणाऱ्या वचनाच्या,

ती संकेतचिन्ह आणि त्या चांदराती…


तसे भिजले शब्द थोडे हास्यात

आणि बसले जाऊन

ताल, लय आणि यमकांत…

न लिहिता भरुन गेला बघ

आयुष्याच्या कागद कोरा

महाकाव्य छान होत राहील जगण्याचं

आता शेवटच राहिला होता फक्त

मस्त जमलं होतं सगळं

ताल,सुर,लय,यमक सगळंच

अन अचानक विज चमकली

मी मिटलेले डोळे उघडले......


फड़फड़त होते कोरे कागद

तुझ्यासारखेच अबोल झाले होते

सारे सूर हरवलेले शब्द

ताल हरवलेलं भावनेच आदंण

यमक चूकलेली कविता

लिहिलंही मी कागदावर काहीबाही

पण ते माझं मलाच पटलं नाही…


माझं मीच मग समजावलं मला

कधी कधी असं होतं

पूर्णत्व असुनसुद्धा क्षितिजही

‘अपूर्ण’ च असतं


Rate this content
Log in