ओढ पावसाची
ओढ पावसाची
श्वासात मनमोकळा मृदूगंध भरण्यास
दृष्टिच्या वलयात सृष्टी सामावण्यास
पहाटेची मंत्रमुग्ध गीते ऐकण्यास
नवचैतन्य, ऊर्जेने ओतप्रोत भरण्यास
ओढ पावसाची मनसोक्त जगण्यास....
दाहकता शमून गारवा अनुभवण्यास
रुचकर मेजवानीचा आस्वाद घेण्यास
प्रफुल्लित अंतःकरणाने भक्तीत गुंतण्यास
धन, धान्याच्या भरभराटीने हर्षोल्हासीत होण्यास
ओढ पावसाची पावित्र्य जपण्यास....
विहंगम दृष्यांत स्वतःला विसरण्यास
ओल्याचिंब मनाच्या तालावर नाचण्यास
प्रेमाच्या शहार्याने भारावून जाण्यास
स्वप्नी आनंदाचे इंद्रधनुष्य पाहण्यास
ओढ पावसाची आठवणीत रमण्यास....
निद्रेच्या कुशीत लोळत राहण्यास
सुट्टीसाठी नवनवीन कल्पना सुचवण्यास
धावपळीच्या काळात सुख उपभोगण्यास
विश्रामातून आळसाला पूर्णविराम लावण्यास
ओढ पावसाची प्रसंगावधान राखण्यास....