नवरात्र चारोळ्या
नवरात्र चारोळ्या
१)
नवरात्रीचे नऊ दिवस
सण हा मांगल्याचा असे
देवीची नऊ रूपे पाहून
मन तिच्याच ठायी वसे
२)
वसे आई जगदंबा
भक्तांच्या ह्रदयात
मनोभावे पूजा करिती
नामजप अंत:करणात
३)
अंत:करणात सामावली
आदिशक्ती आदिमाया
राहो जगदंबे आई भवानी
तुझी कॄपादॄष्टी तुझी छाया
४)
छाया भक्तावरी राहूदे
करिती भक्त नवरात्रीचा जागर
दुष्टांचा संहार करण्या माते
सदैव राहसी तू सादर
५)
सादर असती भक्तजन सारे
ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा
करिता गुणगान तुझे अंबे
दूर होती साऱ्या भय,व्यथा, चिंता
६)
चिंता हरिणी,पाप नाशिनी
संकटमोचन,तू दुर्गामाता
संकट भारी कोसळले जगती
देई धैर्य,बळ तुझ्या भोळ्या भक्ता
७)
भक्ता तारिसी तू
जगतजननी आई
त्रिपुरा सुंदरी,सिध्दीदात्री
करिते नमन तुज अंबाबाई
८)
अंबाबाई विराजित
होऊन सिंहवाहिनी आली
मधु कैटभ दैत्य मारूनही
रक्तांबुजवासिनी झाली
९)
झाली देवी नवरात्रीत नवदुर्गा
आली भक्तांच्या संकटात धावून
गोंधळ मांडिला आई जगदंबेचा
आशिष घेई चरणी मस्तक ठेवून
