नरजन्माची ओवी
नरजन्माची ओवी
योनी लक्षचौऱ्यांशी फिरला
उदय काळ जवळ आला
मनुष्य जन्म श्रेष्ठ लाभला
भगवदकृपेने।।१।।
आहार, निद्रा, भय, मैथुन
सर्वांसाठी असती समान
मनुष्याचे ते वेगळेपण
धर्म धारणेत असे।।२।।
माणसाला देतसे ईश्वर
मन, बुद्धी, चित्त, अहंकार
समजाया प्रभू उपकार
साधन समजावे।।३।।
काम, क्रोध, मद, मत्सर
मोह, दंभ, हे षडविकार
मनुष्याला करती बेजार
दिशा त्यांची बदलावी।।४।।
प्रेम, सद्गुण नि सद्विचार
माणसाचा असावा आचार
कृतज्ञ भावाचा अंगीकार
सदासाठी करावा।।५
ईश्वरी अंश असे जो नर
तेजाने तळपावा सत्वर
स्वहितासाठी कधी लाचार
मुळीच होऊ नये।।६।।
दुसरा नसे दुसरा कोणी
भ्रातृत्व भाव घ्या समजोनि
ईश्वर असे हृदयस्थानी
सर्व जीव जंतूंच्या।।७।।
नित्य नामस्मरण करावे
ईश्वर कार्य सदा घडावे
नरजन्माचे सार्थक व्हावे
माणसाच्या हातून।।८।।
