मरणानंतरच्या भावना
मरणानंतरच्या भावना
"स्मशाना जवळच्या रस्त्याने जा
लवकर पोहोचशील ".
आपोआपच त्या रस्त्यावर
माझी पावले वेगाने पडू लागली...
खरतर जनावर, भूत
ह्यांना नाही कधी मी घाबरले,
पण मानवातील जनावर
अन् भुताला मात्र मी घाबरते.
चालत असताना दिसली
एक चिता धडधडून पेटलेली
कुणीच नव्हते बरोबर ,
आजूबाजूला.
जवळ जाऊन मी म्हंटले,
"ह्या थंडीत तुझी उब मला
माझ्या सहवासाची उब तुला.
नाही मला माहित ,
तू पुरुष की स्त्री,
श्रीमंत की गरीब,
उच्च की नीच,
सुशिक्षित की अशिक्षित ".
एवढेच माझ्या साठी महत्वाचे
एक जीव एकटा चालला आहे
महायात्रेवर.
मला सांग एक तू
अंगावरच्या कपड्यांइतकाच
वेळ घेतला का रे तुझ्या
भावनांनी जाळायला ?...
ह्या कवटी फुटण्याच्या
आवाजापेक्षा
जास्त मोठे होते ते आवाज
ज्यांची तू मन मोडलीस..
कधीतरी कानावर पडले ,
का ते आवाज तुझ्या.
लोकांच्या स्वप्नांची ,
राखरांगोळी केली असशील ,
ती अजूनही ह्या तुझ्या राखेपेक्षा ,
जास्त धगधगत असेल .
जाणवली का तुला कधी ती धग..
तुझ्या पेक्षा जास्त ,
मी मलाच प्रश्न विचारत होते.
अन् उत्तर शोधत होते ..
खर तर आपल्या भावना ठेवाव्या ,
आपल्या कपड्यांवर .
अगदी सहज बदलता आल्या पाहिजे.
हव्या तेव्हा चढवायच्या,
नको तेव्हा उतरवून ,
कपाटात बंद करायच्या...
त्या जर चामडीच्या आत गेल्या,
तर अख्खं आयुष्य नासवतात.
अन् मग जळत राहतो आपण
त्या वणव्यात होरपळत राहतो .
तेव्हा हव्याहव्याशा भावना
पण जळून जात असतात,
आपले न ऐकता..
बाहेरच्या वादळाला मनात
न स्थान देणे
अन् भावनांच्या आवर्तनात
वाहून न जाणे
हे ज्याचे असेल लक्ष
त्यालाच जिवंतपणी
मिळेल मोक्ष .
