मरणाच्या वाटेवर
मरणाच्या वाटेवर
वितभर पोटासाठी
घरदार गाव सोडून ते शहराकडे आले होते
मरणाच्या वाटेवर पायी पायी
परत गावाकडे निघाले होते
भाकरीच्या शोधातील कामगारांना सोबतची भाकरही खाता आली नाही
पोटतिडकीने वाट बघणाऱ्या
आईबाबांची भेटही झाली नाही
ती दारात उभी राहून
त्याची वाट पहात होती
तासा तासाला विचारपूस करत होती
पाय त्याचे दमलेले
पुढे सरकत नव्हते
केविलवाणी डोळे
घरी जाण्याची वाट पहात होते
कोणी अंगाखांद्यावर कडेवर तप्त उन्हात
लेकरबाळांना घेवून जात होते
कोणी डोक्यावरून संसार वाहुन नेत होते
मरणाच्या भितीपोटी
त्यांनी गावाकडची वाट धरली होती
त्यांनाही कळले नाही
केव्हा कुठे मांजर आडवी गेली होती
घरी जाण्याच
ा आनंद
चेहऱ्यावर दिसत होता
मृत्यूही त्यांचा पाठलाग करत होता
प्रत्येकजण भुक पाठीशी बांधुन
आंतर कमी करत होते
मी लवकर घरी येतोय
फोन करून सांगत होते
क्षणभरच्या विश्रांतीने
घात केला
देह त्यांचा रेल्वेगाडी खाली गेला
चालता बोलता होत्याचे
नव्हते झाले
उपाशीपोटीच सारे वैकुंठाला गेले
कुठे कपडे कुठे भाकरी
पडली होती
गावाकडची वाट तिथेच संपली होती
घरी त्यांच्या मरणाचा निरोप पोहचला
प्रत्येकाचा हाडामासाचा गोळा
पोटलीत बांधून नेला
स्वतःच्या पोटचा गोळा
शोधायचा कसा
त्या आईला प्रश्न पडला होता
दारात उभी राहून
वाट पाहणाऱ्या त्या सौभाग्यवतीने
समजदारीने तिच्या कपाळावरचा कुंकू पुसला होता